Tuesday, April 16, 2013

माय नेम इज 'कासिम' खान

कासिम खान या माणसाचीही कमाल आहे… सर्वांना माहित असलेले गुपित या माणसाने चक्क व्हिडिओ कॅमेर्यामध्ये कैद केले. त्याचा फटका भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेल्या अख्ख्या कुर्ला नेहरूनगर पोलीस ठाण्याला बसला. एका अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्यासाठी कासिम खानकडून 500-1000 रूपयांची लाच स्वीकारणार्या एक दोन, दोन, चार नव्हे, तर तब्बल 36 पोलिसांना निलंबित होऊन घरी बसावे लागले.

कासिम खानचा हा कारनामा अगदीच काबिल-ए-तारीफ आहे. एका सामान्य माणसाने भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवण्याचे ठरवले तर काय होऊ शकते, हे कासिम खानने आपल्या कृतीने सिद्ध करून दाखवले आहे. कुर्ला येथील ठक्कर बाप्पा कॉलनीत एक अनधिकृत बांधकाम सुरू असताना, त्याबाबत महापालिकेकडे तक्रार करू नये यासाठी नेहरूनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी लाच मागण्यासाठी जणू याठिकाणी रांगच लावली होती. म्हणजे एखाददुस-या पोलिसाने येऊन चिरीमिरी घेतली तर समजण्यासारखे आहे. कारण अशाप्रकारे 'कोंबडी' शोधण्याचे प्रयत्न कॉन्स्टेबल दर्जाचे पोलीस नेहमीच करत असतात. मात्र एकाच पोलीस ठाण्यातील 36 कर्मचारी-अधिकारी याठिकाणी लाच घेण्यासाठी जातात, हे पाहून खाकी वर्दीची उरलीसुरली इज्जतही धुळीला मिळाली आहे. या प्रकरणात आणखी संतापाची बाब म्हणजे, कासिम खानने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची चित्रफित त्याने भ्रष्टाचार व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरिष्ठांकडे तक्रार म्हणून दिली, तेव्हा एसीबीने त्याबाबत काहीच हालचाल केली नाही. अशा परिस्थितीत कासिम खान यांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास उडाला तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही.

या स्टिंग ऑपरेशनमुळे कासिम खान रातोरात हिरो झाले. मीडियाने त्यांना उचलून धरले. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घरी जाऊन कासिम खान यांच्या मोहीमेला सक्रीय पाठिंबा दर्शवला. मात्र कासिम खान यांची लढाई खूप मोठी आहे. 36 पोलिसांचे निलंबन झाल्याने हे प्रकरण संपलेले नाही. उलट आता कुठे कासिम खान यांच्या संघर्षाला सुरूवात होणार आहे. पोलीस खात्याविरूद्ध पंगा घेण्याचे परिणाम काय असतात, त्याचा अनुभव कासिम खान यांना पावलोपावली येणार आहे. आताच त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पोलिसांच्या कच्चा-बच्चांकडून धमक्या यायला सुरूवात झाली आहे. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 'चोर चोर मौसेरे भाई', ही कहावत सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु इथे तर `पुलिस पुलिस मौसेरे भाई’ आहेत… त्यामुळे कासिम खान यांना मोठय़ा दिव्याला सामोरे जावे लागणार आहे. लाचखोर पोलिसांवरील कारवाई राहिल बाजूला, आता कासिम खान यांनीच अनधिकृत बांधकाम केले म्हणून त्यांना अडकवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस, महापालिका आणि अन्य सरकारी यंत्रणा मिळून कासिम खान यांच्यावर सूड उगवल्याशिवाय राहणार नाहीत.

कासिम खान यांची हिंमत पाहता ते या सर्वांना पुरून उरतील, असा विश्वास वाटतो. मात्र त्यांनी यानिमित्ताने सामान्य जनतेच्या डोळ्यात जे झणझणीत अंजन घातले आहे, ते लक्षात घेण्याची गरज आहे. भ्रष्टाचार हा लाख रूपयांचा असो, नाहीतर शे-पाचशे रूपयांचा, तो भ्रष्टाचारच आहे. आणि भ्रष्टाचारी मग तो कुणीही असो, त्याविरूद्ध जमेल त्या मार्गाने लढा दिला पाहिजे. एकटा कासिम खान जर एका अख्ख्या पोलीस ठाण्याला वठणीवर आणू शकतो, तर उद्या सगळेजण भ्रष्टाचाराविरूद्ध उभे ठाकले तर काय होईल..? मी चिरीमिरी घेणार नाही आणि इतर कुणाला देणारही नाही, अशी प्रतिज्ञा केवळ करून भागणार नाही, तर तशी प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

'माय नेम इज कासिम खान, ऍन्ड आय ऍम नॉट करप्ट'… हेच या कथेचे सार आहे.

- सुनील घुमे

No comments:

Post a Comment