Friday, March 8, 2013

फेरीवाल्यांना 'राजा'श्रय

फेरीवाले हे मुंबईकरांसाठी अडचण आहेत की उपयुक्त, हे तुम्ही त्यांच्याकडे कोणत्या चष्म्यातून बघता यावर अवलंबून आहे. कारण म्हटले तर फेरीवाल्यांनी मुंबईची वाट लावली आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचवेळी घरातून बाहेर पडल्या पडल्या किंवा कामावरून येता-जाता भाजीपाला, फळफळावळ आणि अन्य कसलीही वस्तू उभ्या उभ्या खरेदी करण्याची सोय या फेरीवाल्यांमुळेच झालेली आहे.

फेरीवाले हे मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेले आहेत. मग ते अधिकृत आहेत की अनधिकृत, त्यांच्याकडे परवाना आहे की ते बेकायदा धंदा करतात, याच्याशी मुंबईकरांना काहीही देणेघेणे नसते. एखाद्या सजग नागरिकाने अनधिकृत फेरीवाले हटवण्यासाठी महापालिकेकडे तक्रार केली तर त्या तक्रारीची काय गत होते, हे एकदा तक्रार करून पाहाच. पालिकेचे अधिकारी कारवाई करत नाहीच, उलट तक्रारदारालाच फेरीवाल्यांच्या दादागिरीचा सामना करावा लागतो. काहींना हे फेरीवाले गरीब, कष्टकरी वगैरे वाटतात. म्हणजे ते तसे असतात, परंतु त्याचवेळी ते उर्मट, उद्दाम आणि गुंड देखील असतात. स्थानिक राजकीय नेत्यांशी त्यांचे लागेबांधे असतात. स्थानिक महापालिका अधिकार्यांना आणि पोलिसांना हफ्ते देऊन त्यांनी कायमचे बांधून ठेवलेले असते. करोडो रूपयांची ’चिरीमिरी’ हे गरीब, कष्टकरी फेरीवाले ’राजाश्रया’साठी मोजत असतात.

अलिकडेच वाकोला, सांताक्रूझ विभागात वादग्रस्त एसीपी वसंत ढोबळे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची कारवाई सुरू करण्याची हिंमत दाखवली. त्या कारवाईदरम्यान दुर्दैवाने एका फेरीवाल्याचा मृत्यू झाला. बस्स ढोबळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले. फेरीवाल्याच्या मृत्यूचे खापर फोडून रातोरात ढोबळेंची बदली करण्यात आली. खरे तर ढोबळेंचे काहीच चुकले नव्हते. जे कुणी बेकायदा फेरीवाले आहेत, त्यांनाच हटवण्याचे कर्तव्य ते पार पाडत होते. म्हणजे आपले कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्यांना शिक्षा झाली. फेरीवाल्यांविरोधात, मग ते अनधिकृत का असेनात, कारवाई कराल तर अशी शिक्षा होईल, असा चुकीचा मेसेज या प्रकरणामुळे गेला. एकीकडे या कारवाईमुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपचे राजकीय नेते सुखावले. तर बहुसंख्य फेरीवाले हे उत्तर भारतीय असल्याने शिवसेना आणि मनसेला राजकीय पोळी भाजून घेण्याची संधी उपलब्ध झाली.

शिवसेनेने वसंत ढोबळे यांची बदली रद्द करावी, यासाठी दोन-तीन दिवस आंदोलन केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर यानिमित्ताने फेरीवाल्यांना ’मनसे स्टाइल’ कारवाईचा इशाराच दिला. राज ठाकरे यांनी यानिमित्ताने अकलेचे सिक्सर-फोर मारले. काय तर म्हणे परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे मुंबईची वाट लागली आहे. मग मराठी फेरीवाल्यांनी काय मुंबईला चार चॉंद लावले आहेत. अनधिकृत फेरीवाले, मग ते परप्रांतीय असोत नाहीतर मराठी असोत, त्यांना रस्त्यावरून हटवलेच पाहिजे. एसीपी वसंत ढोबळे यांनी काही फेरीवाला मराठी आहे की परप्रांतीय, हे बघून कारवाई केली नव्हती. मात्र प्रत्येक गोष्ट आपल्याच चष्म्याच्या फ्रेममधून पाहणा-या राज ठाकरेंना काय बोलायचे? बरं राज ठाकरे फेरीवाल्यांच्या विरोधात बोलतात म्हणून मग आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व कामगार नेते शरद राव यांनाही फेरीवाल्यांचा पुळका आला. राज ठाकरे मोर्चाला विरोध करतात, मग आता 19 फेब्रुवारीला मोर्चा काढून दाखवतोच, असे आव्हान शरद राव यांनी दिले आहे. म्हणजे हे देखील दुसरे टोकच म्हणायचे. फेरीवाल्यांना अशाचप्रकारे कायम राजकीय आश्रय मिळत आल्याने आजवर त्यांचे कुणीही काहीही (म्हणजे स्टॉल, पाटी, गाडी वगैरे) वाकडे करू शकलेले नाही.

फेरीवाल्यांचा प्रश्न महापालिका, पोलीस किंवा राजकीय पक्षांकडून सुटण्याची सूतराम शक्यता नाही. तो सुटू शकतो केवळ जनतेची इच्छा असेल तर आणि तरच ज्यादिवशी अनधिकृत फेरीवाल्यांकडून कसलाही माल विकत घेणार नाही, अशी सवय मुंबईकर स्वतःला लावून घेत नाहीत तोपर्यंत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मुंबईला कुणीही वाचवू शकणार नाही. आणि असा एखादा दिवस उजाडण्याची शक्यता पुढच्या शंभर वर्षांमध्ये दिसत नाही

- सुनील घुमे

No comments:

Post a Comment