Friday, March 8, 2013

प्रेमाला 'जागा' नाही, हे मुंबईकरांचे 'दुखणे'...

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं..!

असं म्हणणा-या कवीवर्य मंगेश पाडगावकरांना यंदाच्या प्रजासत्ताकदिनी पद्मभूषण पुरस्कार जाहीर व्हावा आणि पोलिसांच्या कृपेने मुंबईमध्ये प्रेमी युगुलांवर संक्रांत ओढवावी, हे अगदी विचित्र योगायोग म्हणायला हवेत.

मुंबईतील चौपाटया, उद्याने, बगिचे आणि निर्जनस्थळे म्हणजे प्रेमी युगुलांची आश्रयस्थाने. मात्र यापुढे ’खुल्लमखुल्ला’ प्रेम करण्यावर बंदी घालणारे फर्मान मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी जारी केले आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा निर्जनस्थळी बसणार्या प्रेमी युगुलांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देऊन पोलीस आयुक्तांनी प्रेमवीरांची पुरती कोंडी केली आहे. काय तर म्हणे, प्रेमी युगुलांची सुरक्षितता लक्षात घेऊनच हा खबरदारीचा उपाय आखण्यात आला आहे, असा युक्तिवाद सत्यपाल सिंग आणि त्यांचे पोलीस अधिकारी आता करत आहेत. दिल्लीतील बलात्कारासारखी घटना घडू नये आणि त्यानिमित्ताने दिल्लीसारखा उद्रेक मुंबईत होऊ नये, यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ही कारवाई केल्याचे लंगडे समर्थन ते करत आहेत. रोगापेक्षा इलाज भयंकर म्हणतात, ते यालाच

कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. मग ते सार्वजनिक ठिकाण असो, नाहीतर निर्जनस्थळ. निर्जनस्थळी बलात्कार, खून किंवा लुटमारीची घटना होईल, म्हणून प्रेमी युगुलांवर बंदी घालणे हा काही उपाय होऊ शकत नाही. महिलांवर बलात्कार आणि अत्याचार होतात म्हणून त्यांना ’सातच्या आत घरात’ यायला सांगणारे, तोकडया कपडयांऐवजी बुरख्यामध्येच महिलांनी वावरावे, असे तालिबानी फर्मान काढणारे लोक आणि मुंबई पोलीस यांच्यात मग फरक तो काय उरला? कोण जाणे उद्या महिलांवर रात्री-अपरात्री अत्याचार होतात, म्हणून त्यांना कामावर पाठवूच नका, असा उपायही ’डॉक्टर’ असणारे सत्यपाल सिंग सुचवतील. मुळात अशाप्रकारच्या घटना वाढीला लागतात, कारण पोलिसांचा किंवा न्यायालयाचा धाकच अलिकडे गुन्हेगारांना वाटेनासा झाला आहे. निर्जनस्थळांचे सोडा, मुंबईसारख्या शहरात दिवसाढवळ्या भररस्त्यावर महिलांवर हल्ले होतात, तेव्हा दोष कुणाला देणार? पोलीस या यंत्रणेची जरब असती तर गुन्हेगारांची एवढी हिंमत झालीच नसती. त्यामुळे बलात्कार किंवा हल्ले होतात म्हणून प्रेमी युगुलांवर बंदी घालणे हा कधीच उपाय होऊ शकत नाही. पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी गेल्या काही दिवसांत विविध कॉलेजांना भेटी देऊन युवा पिढीशी संवाद साधण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्याचे कौतुक केले पाहिजे. मात्र त्याचवेळी प्रेमी युगुलांवर बंदी घालून युवा पिढीची मिळवलेली सहानुभूती गमावण्याची कामगिरीही ते पार पाडत आहेत.

आता यानिमित्ताने प्रेमी युगुलांचा विषय ऐरणीवर आलाच आहे, तर एका महत्त्वाच्या सामाजिक समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. ही समस्या आहे जागेची. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात हक्काची जागा असणे, हे स्वर्गसुखच मानायला हवे. लहान मुलांना खेळण्यासाठी बालोद्यान असतात, मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणे असतात, अगदी वृद्ध आजी-आजोबांसाठी ’नाना नानी पार्क’ असतात, मग प्रेमी युगुलांसाठी हक्काचे असे एखादे ’क्युपिड पार्क’ असायला नको का? ज्याठिकाणी मनमोकळेपणाने आपल्या प्रियजनांशी गुजगोष्टी करता येतील, अशी जागा नको का? प्रेमी युगुलांचे सोडा, मुंबईसारख्या शहरात अगदी नवरा-बायकोला देखील छोटयाशा घरामध्ये प्रायव्हसी मिळत नाही. मग त्यांनी एखाद्या शनिवारी-रविवारी चौपाटीवर जाऊन दोन-चार सुखाचे क्षण शेअर केले, तर पोलिसांच्या पोटात दुखले कुठे? आज मुंबईच्या चौपाटया किंवा बोरिवलीचे नॅशनल पार्क आहे, म्हणून प्रेमी युगुलांना थोडेफार निवांत क्षण मिळत आहेत. ते क्षण देखील आपण त्यांच्यापासून हिरावून घेणार का? म्हातारीच्या बुटाशेजारच्या हँगिग गार्डनमध्ये बसून प्रेमी जीवांनी ’रोमँटिक’ क्षण एन्जॉय करायचे ठरवले, तर त्यांच्यावर अश्लील चाळे केल्याचा ठपका आपण आणखी किती दिवस मारणार आहोत? यावर समाधान शोधायचे असेल तर मुळात प्रेमी युगुलांची ही नाजूक अडचण समस्या म्हणून आधी समजून घ्यायला हवी.

नाहीतर ख्यातनाम गीतकार जगदीश खेबूडकर यांच्या गाण्यात बदल करून खेदाने म्हणावे लागेल की,
प्रेमाला ’जागा’ नाही, हे मुंबईकरांचे ’दुखणे’

- सुनील घुमे

No comments:

Post a Comment