Tuesday, March 12, 2013

केमिस्ट संपाचा 'डोस'

जागोजागी पानाच्या टपरीसारखी सुरू झालेली मेडिकल दुकाने गेल्या आठवडयात चर्चेत आली ती त्यांच्या आंदोलनामुळे. एरव्ही दिवसाचे बारा-बारा तास आणि काही तर 24 तास उघडया असणा-या केमिस्ट दुकानदारांनी संध्याकाळी 6 नंतर ‘शटर डाऊन’ केले. सकाळी 10 ते सायंकाळी 6 अशी आठ तासांची ‘ऑफिस डयुटी’ करण्याचे फर्मान केमिस्ट दुकानदारांच्या संघटनेने जारी केले. दोन-तीन दिवस त्या आदेशाची अंमलबजावणीही झाली. अचानक हा पवित्रा घेण्याचे कारण काय..? तर म्हणे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जारी केलेल्या फार्मासिस्टच्या सक्तीचा विरोध करण्यासाठी मेडिकल स्टोअर्स आणि केमिस्ट दुकानदारांनी हे पाऊल उचलले. केमिस्ट विरूद्ध एफडीए यांच्या या भांडणात भरडले गेले ते सामान्य रूग्ण. पण त्याची चिंता ना संपकरी केमिस्टना होती, ना एफडीएला...

खरे तर अन्न व औषध प्रशासनाचे काही चुकले असे म्हणता येणार नाही. प्रत्येक औषधाच्या दुकानात फार्मासिस्ट (औषधतज्ञ) असणे गरजेचे आहे, अशी तरतूद कायद्यामध्येच आहे. डॉक्टरांनी एखाद्या रोगावर औषध लिहून दिल्यानंतर ते योग्य आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी केमिस्ट दुकानांमध्ये फार्मासिस्ट (डी. फार्म किंवा बी. फार्म) असायला हवा. याचाच अर्थ रूग्णांना चुकीचे औषध दिले जाऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. कायद्यातील याच तरतुदीची काटेकोर अंमलबजावणी करत एफडीएचे आयुक्त महेश झगडे यांनी केमिस्ट दुकानांवर कारवाई करायला सुरूवात केली. राज्यात जवळपास 51 हजार औषधांची दुकाने आहेत. जानेवारी ते 18 फेब्रुवारी 2013 या काळात त्यापैकी 5 हजार 415 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात 1 हजार 13 दुकानांमध्ये फार्मासिस्ट आढळले नाहीत. त्यापैकी 639 केमिस्ट दुकानांवर औषध विक्रीस बंदी घालण्यात आली. 50 जणांचे परवाने रद्द करण्यात आले, तर 40 दुकानदारांचे परवाने ठराविक कालावधीसाठी रद्द करण्यात आले. एफडीएच्या या धडक कारवाईचा विरोध करण्यासाठी औषध विक्रेत्यांनी सायंकाळी 6 नंतर दुकाने बंद ठेवून आंदोलन केले. आता कायद्यात असलेल्या तरतुदीची अंमलबजावणी करणे हे तर एफडीएचे कर्तव्यच आहे. त्यात ते जर रूग्णांच्या भल्यासाठी असेल तर फार्मासिस्टची सक्ती योग्यच आहे, असेच म्हणावे लागेल.

परंतु महाराष्ट्र राज्य ड्रगिस्ट केमिस्ट असोसिएशनचे मुंबई विभागीय अध्यक्ष हुकुमराज मेहता यांच्या मते, एफडीएने चालवलेला हा छळ आहे. राज्यात केवळ 1 लाख 39 हजार नोंदणीकृत फार्मासिस्ट असून, त्यापैकी अनेकजण औषध कंपन्यांच्या सेवेत असतात. त्यामुळे केमिस्ट दुकानदारांना पूर्णवेळ फार्मासिस्ट उपलब्ध कसे होणार? दुसरा मुद्दा म्हणजे पूर्वीच्या काळी रूग्णांना औषधे मिक्स करून द्यावी लागायची, त्यामुळे तेव्हा फार्मासिस्टची गरज होती. आता औषधे तयार स्वरूपातच कंपन्यांकडून मिळतात. त्यात चुकीचे औषध घेतल्याने रूग्ण दगावल्याची एकही तक्रार आलेली नाही, असेही मेहता यांचे म्हणणे आहे. अहो मेहतासाहेब, तक्रार येणार कशी..? मुळात आपल्या चुकीचे औषध दिले गेले आहे, हे रूग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकाला कळायला तर हवे ना.. त्यासाठीच तर फार्मासिस्ट असतो ना? मुळात औषधाच्या चिठ्ठीवर डॉक्टरने काय लिहिले आहे, हे सामान्य माणसांना धड वाचताही येत नाही. डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन काय ते केमिस्टला बरोबर कळते. त्यामुळे डॉक्टरने लिहिलेले आणि केमिस्टने दिलेले औषध आपण सगळेच डोळे झाकून घेतो. परंतु आता फार्मासिस्ट नावाची आणखी एक भानगड असते, म्हटल्यावर रूग्णांचा या दोघा देवदूतांवरील विश्वास काहीसा कमी झाल्याशिवाय राहणार नाही.

संपातून केमिस्ट दुकानदारांनी काय साध्य केले आणि एफडीए आता पुढे काय करणार, हे कळेलच. परंतु या आंदोलनाच्या निमित्ताने सर्वसामान्य ग्राहकांना मात्र चांगलाच ‘डोस’ मिळाला आहे. किंबहुना त्यांचे डोळे उघडले आहेत

- सुनील घुमे

No comments:

Post a Comment